पाऊली चालती करहर प्रति पंढरीची वाट…. अशी भक्तीची प्रथा करहर नगरीत गेले अनेक वर्ष पासून सुरू आहे.आषाढी एकादशी निमित्त उपस्थित सर्व वारकऱ्यांच्या मुखी फक्त विठू माऊली व संतांचा गजर असे दृश्य पाहून ग्रामीण भागातून आलेल्या हरिभक्त पारायण यांना मनशांती मिळाली आहे.
करहरच्या भूमीत अध्यात्मिक समाधानाने आषाढी एकादशीला संतमात्म्यांनी केलेल्या कार्याचा गौरव वारकऱ्यांच्या मुखातून टाळ मृदंगाच्या नादात गुंतला गेला.
विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला जावळी तालुक्यातील करहर परिसरातील पालखी सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्याचे भाग्यच.आज माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जावळीचे तहसीलदार हनमंतराव कोळेकर,गटविकास अधिकारी मनोज भोसले,मेढा पोलीस अधिकारी पृथ्वीराज ताटे व उद्योजक वसंतराव मानकुंमरे,प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ (बाबा)शिंदे,जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे,आमदार शशिकांत शिंदे यांच्या पत्नी वैशाली शिंदे,रवि परामणे,अमोल शिंदे यांच्यासह खेड्यापाड्यातून पालखी घेऊन आलेल्या भक्तगणांनी श्री माऊलीचे दर्शन घेऊन सर्वांना सुख- शांती- समृद्धी मिळावी अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.
काटवली,पानस, दापवडी, विवर,कावडी,बेलोशी,वहागाव,महू-हातगेघर,खर्शी- बारामुरे,दांडेघर,आखाडे, हुमगाव,आंबेघर,सलपाने,रुईघर, कुडाळ,शेते,भालेघर,सोमर्डी,पाचगणी,रांनगेघर, इंदवली,आलेवाडी,भिवडी, सोनगाव,दरे,भिलार,महाबळेश्वर,मेढा,सायगाव,बामणोली अशा अनेक गाव वाड्या वस्तीतील वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
माता भगिनींसोबत युवा पिढीचे आध्यात्मिक गोष्टीकडे कल वाढत आहे.खऱ्या अर्थाने करहर नगरी आषाढी एकादशी निमित्त एक दिवसासाठी अध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
करहर परिसरातील भाविक व वारकरी ह.भ.प.दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रेरणेतून करहर नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज,संत गाडगे महाराज अशा संत महात्म्यांच्या नावाच्या दिंडी घेऊन प्रति पंढरपूर नगरीत येऊन माऊलीच्या प्रतिभेचे दर्शन घेण्यासाठी खूप मोठी रांग लागलेली असते.
विठ्ठल नामाचा गजर सर्वत्र घुमत असल्याने खऱ्या अर्थाने प्रति पंढरपूर सजून गेले.वास्तविक पाहता वर्षभर अनेक घडामोडी घडतात? या काळात राजकीय वादन व चिपळ्यांच्या आवाजही वारकऱ्यांच्या आवाजात मिसळून जातो. त्याचेही दर्शन या निमित्त करहर परिसरात दिसून आले आहे.
प्रति पंढरपूर म्हणजे करहर हे जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र होय.आषाढी एकादशीला ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही.अशा प्रामाणिक व स्वच्छ मनाच्या वारकऱ्यांसाठी करहर या गावात बहिर्जी पांगारे नावाच्या एका विठ्ठल भक्त त्याच्या भक्तीमुळे हे प्रति पंढरपूर उभे राहिलेले आहे.निरंजन नदीच्या डोळ्यात स्नानासाठी गेले असता त्यांना विठ्ठल रुक्माईची मूर्ती सापडली.या मूर्तीची प्रतिष्ठापना करहर गावातील दानशूर व आध्यात्मिक वारसा लाभलेल्या एका पिढीने केली.
आजही या ठिकाणी आषाढी एकादशी दिवशी सुमारे दहा हजार भाविक व वारकरी या प्रति पंढरपूर मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात.ह.भ.प दत्तात्रय महाराज कळंबे यांनी पन्नास वर्षांपूर्वी आषाढी वारी सुरू करून खऱ्या अर्थाने संघर्षाच्या वादळ वाऱ्यातही आध्यात्मिक ज्योत तेवित ठेवण्याचे अत्यंत अवघड काम सहजरीत्या पार पाडले आहे.बेलोशी येथे दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या समाधीस्थळी याचे पूर्ण नियोजन करण्यात येते.कळंबे महाराजांच्या पादुकांचे काटवलीला प्रस्थान व त्यानंतर या दिंडीला सुरुवात होते.दापवडी येथे पहिले रिंगण व महू येथे गोल रिंगण झाल्यानंतर ह.भ.प अविनाश महाराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दिंडी सोहळा शांततेत संपन्न झाला.यावेळी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच अनेक सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांना मोफत फराळ वाटप केले.