सिद्धेश विष्णू जवळ याचा मृत्यू हा महावितरणच्या चुकीमुळे झाला असून त्याची जबाबदारी ही महावितरण कंपनीने स्विकारावी या मागणीसाठी आज जवळवाडी,मेढा ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यांनी मेढा ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
या घटनेबाबतचे सविस्तर वृत्त असे की सिद्धेश विष्णू जवळ वय वर्षे 18 हा युवक आपल्या अन्य मित्रांबरोबर सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मेढा मोहाट पुलाच्या खालच्या बाजूस कण्हेर जलाशयाच्या नदी पात्रात पोहत असताना पाण्याच्या फुगवटयाच्या वरून अगदी दीड ते दोन फुट अंतरावरून गेलेल्या वीजेच्या तारेला पोहताना त्याचा हात लागल्याने शॉक लागून जागीच पाण्यात बुडून मृत्यू झाला.घटनेची माहीती कळताच ग्रामस्थांसह,पोलीस प्रशासन व मान्यवरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.रात्री उशीरा पर्यंत शोध मोहिम ग्रामस्थ, युवक व रेस्क्यूटीमच्या मदतीने सुरू होती.अंधार पडल्याने ही मोहीम थांबविण्यात आली.
सिध्देश हा प्रत्येक सार्वजनिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असे. त्यामुळे जवळवाडी गावात व मित्रांमध्ये तो अत्यंत प्रिय होता. त्याच्या कुटुंबांसह संपूर्ण जवळवाडी गाव चिंतेत असून सर्व संपूर्ण मुंबईकर सुध्दा मिळेल त्या वहानाने गावाकडे येत आहेत.आज मंगळवार दि. १५ ऑक्टोंबर रोजी सकाळ पासूनच जवळवाडी,मेढा ग्रामस्थ व युवकांनी पुन्हा शोध मोहिम सुरू केली होती. सिद्धेश ज्या ठिकाणी बुडाला होता त्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता मृतदेह दिसून आल्याने मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पी.एम.साठी ग्रामीण रुग्णालय मेढा येथे नेले असता त्या ठिकाणी जळवाडी मेढा ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करून मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध दर्शविला.सिद्धेशचा मृत्यू हा महाविजवितरणाच्या चुकीमुळे झाला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या वर मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनी वाईचे कार्यकारी अभियंता विशाल शिवथरे व मेढा महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता सुधाकर भुतकर यांनी ग्रामस्थांची चर्चा करून लेखी पत्र दिल्याने व पंचवीस हजार रोख रक्कम तातडीची आर्थिक मदत कुटुंबीयांना दिल्याने सिद्धेशचा मृतदेह ताब्यात घेऊन दुपारी दोन वाजता वेण्णातीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चौकट-
महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकार्यांनी वेळीच लक्ष या ठिकाणी दिले असते तर निष्पाप जीव गेला नसता.पाण्याच्या लाटा तारांना चिटकून अनेक वेळा लाईट स्ट्रीप होवून लाईन बंद होत होती. गतवर्षापासून याबाबत महावितरणकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत.गणेशोत्सवानंतर शेकडोजण येथे पोहण्याचा आनंद घेत असतात पण धोका असूनही या बाबत महावितरण दखल घेतली नाही.याची खंत वाटते.
विलासबाबा जवळ
माजी राज्याध्यक्ष,व्यसनमुक्त संघ