जावली तालुका हा अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी,विद्यार्थिनी आपल्याला लागणारे शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठी मेढा येथे ये-जा करत असतात.परंतु तहसील कार्यालय जावली अंतर्गत नक्की किती शैक्षणिक दाखले देण्याचे केंद्र आहेत?असा प्रश्न विद्यार्थी व पालकांनी उपस्थित केला आहे.मेढा तहसील कार्यालय आवारातील आधारकेंद्रामध्ये महा ई सेवेचे काम राजरोसपणे सुरू आहे.याठिकाणी दाखल्यासाठी शासकीय शुल्कापेक्षाही अधिकची फी घेतली जात असून विद्यार्थ्यांची लूट होत आहे.याबाबत तहसील प्रशासन गांधारीच्या भूमिका बजावत असल्याने सर्व सामान्य जनतेला मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यासह राज्यांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे.तसेच अकरावी,तेरावी अशा विविध कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे काढण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे.याकरिता तहसील आवारातील असलेल्या सेतू केंद्रांमध्ये शासकीय शुल्कानुसार दाखले बनवले जातात.परंतु तहसील आवारातीलच असणाऱ्या दुसऱ्या केंद्रावर दाखल्यासाठी अक्षरशा पैशाची लूट सुरू असल्याचे विद्यार्थी व पालकांमधून बोलले जात आहे. जावली तालुका तहसील अंतर्गत जी महा-ई-सेवा केंद्र येतात ती ज्याच ठिकाणी असायला हवीत असा शासन निर्णय आहेअसे असतानाही करहर येथील महा ई सेवा केंद्र मेढा येथे कसे काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.तसेच कोणाच्या आश्रयाने हे सर्व चालले आहे असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.या ठिकाणी आधार कार्ड केंद्राच्या नावाखाली दाखले व मोठ्या प्रमाणात प्रतीज्ञापत्र देण्याचे प्रकार होत आहेत.तहसील परिसरातील चाललेल्या या पंडितायनाचे नेमके कैवारी कोण आहेत.मान्यता एका ठिकाणची अन अनधिकृत केंद्र दुसरीकडे चालवणे ही प्रशासनाची फसवणुक आहे.आधार केंद्राच्या नावाखाली हा प्रकार राजरोसपणे चालू असून जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे.सेतू केंद्राऐवजी यांचाच जास्त रुबाब याठिकाणी चालत आहे.तसेच तहसील आवारा बाहेरील आधार कार्ड केंद्राच्या नावाखाली चालू असलेल्या महा ई सेवा केंद्राला इंटरनेट व वीज ही तहसील कार्यालयातूनच पुरवण्यात येत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.तसेच ज्या सर्कल विभागासाठी महा.ई.सेवा केंद्र दिलेले आहेत त्याच सर्कलमध्ये ती चालू करावीत अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. आधारची कामे होत नाहीत,आधार साइट बंद आहे असे सांगून दाखल्याची कामे मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.तसेच दाखले देताना एकच लॉगिन असल्याचे कारण पुढे देत विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच पालकांना अडकत ठेवण्याचे प्रयत्न आधार केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या महा ई सेवा केंद्र चालकांकडून होऊ लागले आहे.परंतु लॉगिन जरी एक असले किंवा दहा असले याच्याशी आमचा काय संबंध असा प्रश्न यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे तहसील आवारातून आधार केंद्रातून जे काही दाखले वितरित केले जात आहेत. यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. चौकट: शासकीय ॲफडीव्हीट फी,आधार केंद्राच्या नावाखाली दाखले देऊन जी विद्यार्थी पालकांची लूट सुरू आहे.ती त्वरित थांबवण्यात यावी.तसेच जर वेळेत दाखले मिळाले नाहीत तर आमच्या होणाऱ्या शैक्षणिक व आर्थिक नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील. ……….एक विद्यार्थी……