पाचवड ते रत्नागिरी या नवीन रस्त्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.त्यामुळे पाचगणी-महाबळेश्वरला जाणारी वाहतूक ही कुडाळ-पाचगणी या रस्त्यावरून सुरू आहे. दररोज हजारो वाहने कुडाळ ते पाचगणी रस्त्यावरून ये-जा करत आहेत.यात वारंवार पडत असणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.कुडाळ येथील रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचे पाहायला मिळत आहे.करहर येथील आषाढीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ या रस्ताववरील खड्डे मुजवावेत अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
दरवर्षीप्रमाणे येत्या रविवारी प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या करहर मध्ये आषाढी एकादशीचा मोठा कार्यक्रम होणार आहे.या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे लोक येत असतात.काही दिवसापूर्वी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न झाली होती.या बैठकीमध्ये छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्येक विभागाला आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सूचित केले होते असे असताना देखील जावली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुडाळ-पाचगणी रस्त्यावरील खड्डे अजूनही मुजवले नाहीत.त्यामुळे प्रति पंढरपूर करहर येथे आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
तसेच सुरू असणाऱ्या संतधार पावसामुळे पाचगणी,महाबळेश्वर या पर्यटन स्थळाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.येणाऱ्या पर्यटकांना कुडाळ ते पाचगणी या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो आहे.त्यामुळे पर्यटकांना देखील या खड्ड्यांमुळे वाहतुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तसेच सर्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कुडाळ ते करहर या रस्त्याच्या दरम्यान असणारे सर्व खड्डे लवकरात लवकर मुजवावेत अशी मागणी नागरिक व वाहनधारक करू लागले आहेत.
चौकट:
जावली बांधकाम विभाग गांधारीच्या भूमिकेत
कुडाळ-पाचगणी रस्ता कायम वाहतुकीचा असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत करहर येथे झालेल्या आढावा बैठकीत बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तात्काळ खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या होत्या.असे असतानाही आजपर्यंत कुडाळ पाचगणी रस्त्यावरील खड्डे मुजवण्यात आलेले नाहीत.त्यामुळे जावली सार्वजनिक बांधकाम विभाग नक्कीच गांधारीची भूमिका बजावत आहे.असा खोचक सवाल नागरिक आणि वाहतूकदार यांच्याकडून होऊ लागला आहे.गांभीर्याने याचा विचार करून तात्काळ या रस्त्यावरील खड्डे मुजवले जावेत अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.