शैक्षणिक वर्ष सुरू झाले की विद्यार्थी-पालकांचे प्रवेश प्रक्रिया करता आवश्यक असणारे दाखले मिळवण्यासाठी धावपळ सुरू होते.याकरिता विद्यार्थी जवळच्या महा-ई-सेवा केंद्राकडे धाव घेतात. जिल्ह्यातील या महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून विद्यार्थ्यांचे दाखले,ॲफॅडेविट व इतर शासन अनुषंगिक दाखले देण्यासाठी प्रक्रिया होत असते.या कामांसाठी मात्र त्यांच्याकडून वेगवेगळे शुल्क आकारून सामान्यांची लुटमार केली जात असल्याचे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होते.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याची दखल घेत सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना महा-ई-सेवा केंद्राची सखोल तपासणी करून त्याचा अहवाल दरमहा पाच तारखेच्या आत उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करण्याबाबतचा आदेश नुकताच पारित करण्यात आला आहे.प्रशासनाच्या या धाडसी निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होऊ लागले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या अनुषंगाने जावलीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी जावलीतील असणाऱ्या कुडाळ,करहर,केळघर,मेढा,आनेवाडी,बामनोली विभागातील महा-ई-सेवा केंद्राची सखोल तपासणी करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करण्याचे आदेश मंडल अधिकारी यांना दिले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे जावलीसह संपूर्ण जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रावर सुरू असणारी लूट थांबण्यास नक्की मदत होईल अश्या भावना नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
महा-ई-सेवा केंद्र बाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला आहे.परंतु जावली तालुक्यासह जिल्ह्यात असणाऱ्या सी.एस.सी सेंटर बाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांच्यासाठी नियमावली बनवावी.अशी मागणी जोर धरु लागली आहे.महा-ई-सेवा केंद्राच्या नावाखाली काही सी.एस.सी सेंटर चालकांकडून स्वतःला आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने विनापरवाना दाखले देण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत.कुडाळ व करहर भागासह तालुक्यात काही ठिकाणी असे प्रकार सुरू असून याची सखोल चौकशी जावलीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर करणार का? असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला आहे.
काही सी.एस.सी केंद्र चालकांकडून मोठ्या प्रमाणात शेतकरी,विद्यार्थी,पालक तसेच माता-भगिनी यांच्याकडून शासनाच्या येणाऱ्या योजनेचे फॉर्म भरणे व इतर कामासाठी जास्त रक्कम घेतली जात असल्याचे शेतकरी व नागरिकांमधून बोलले जात आहे.त्यामुळे तहसीलदार यांनी अशा सी.एस.सी सेंटरची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.महा-ई-सेवा केंद्रांबरोबरच सी.एस.सी सेंटर चालकांचीही सखोल चौकशी व्हावी आणि शासनाच्या येणाऱ्या योजनांचे फॉर्म भरणे व इतर कामांबाबत लागणाऱ्या शुल्क आकारणीबाबत नियमावली करावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
चौकट:
काही महा-ई-सेवा केंद्र चालकांना हाताशी धरून स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने विद्यार्थी व पालकांचे दाखले काढण्याच्या नावाखाली काही कुडाळ व करहर भागातील सी.एस.सी केंद्र चालक विनापरवाना दाखले काढत आहेत. त्यांच्यावर लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.अन्यथा विद्यार्थी व पालकांची लूटमार होतच राहील यात तीळमात्र शंका नाही.
एक पालक…
कोट:
सी.एस.सी केंद्र चालकांकडून गोर गरिबांची होतेय लुट
जावली तालुकात कुडाळ, करहर,मेढा या ठिकाणी सी.एस.सी केंद्र सुरू आहेत.परंतु काही सी.एस.सी केंद्र चालकांकडून फॉर्म भरण्याच्या नावाखाली गोरगरिबांची आर्थिक लूट केली जात आहे.त्यामुळे तहसीलदार यांनी सी.एस सी केंद्राची सखोल चौकशी करून त्यांच्यावर अंकुश लावावा.तसेच सी.एस.सी सेंटर चालकांना फार्म व इतर सेवा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शुल्क आकारणीबाबत नियमावली जाहीर करावी.
सामान्य शेतकरी