जावली तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शासनाकडे सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांनी पक्षाचे वतीने केली आहे.राज्याचे मा.मुख्यमंत्री,मा. उपमुख्यमंत्री,मा.कृषिमंत्री,मा.सातारा जिल्हा पालकमंत्री , मा. जिल्हाधिकारी सातारा, मा. प्रांताधिकारी जावली, मा. तहसिलदार जावली यांना मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनाद्वारे जावलीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात माहिती नुसार चालू वर्षी में महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला असून अद्यापही पाऊस थांबत नसल्याने जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीत पेरण्याच करता आल्या नाहीत. तसेच ज्यांनी पेरण्या केल्या, त्यांच्याही पेरण्या पावसामुळे वाया गेल्या आहेत. त्यामुळे पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तसेच पेरणी वाया गेल्यामुळे नुकसान झालेत्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करीत आहोत असे सुचित केले आहे.
सर्वसाधारण तालुक्यात १४ ते १५ जून नंतर पावसाला सुरुवात होते, तर जुलै, ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.यावर्षी मे महिन्यापासूनच मोठा पाऊस सुरू झाला. जून संपला तरी पाऊस थांबण्याचं काही नाव घेत नाही. सातत्याने पाऊस पडत असल्याने यावर्षी जावली तालुक्यात शेतकयांच्या अद्याप पेरण्याच होऊ शकल्या नाहीत. संततधार पावसामुळे यापुढे त्या पेरण्या होतील याची शक्यता नाही. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या संकटाचा व गंभीर परिस्थितीचा विचार करून जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील गोरगरीब शेतकरी पूर्णपणे आपल्या शेतीवर अवलंबून आहे. भातपिक हे येथील मुख्य पिक आहे. डोंगर पठारावर असणारी पारंपरिक शेती यावर्षी पावसामुळे पूर्णपणे अडचणीत आल्याने स्थानिक शेतकरी हवालदिल झाला आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला शासनाने दिलासा द्यावा.
तालुक्याचे ५०, १७४हे. भौगोलीक क्षेत्र असून त्यापैकी २२, ७००हे. क्षेत्र हे खरीप पिकाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ८६०० हे. क्षेत्रावर भात पिक घेतले जाते.तालुक्याचे सरासरी प्रजन्यमान १६०३ मि.मी. असून गेल्या दिड महिन्यात पाऊस सरासरीकडे चालला आहे . तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून , बळीराजा हवालदिल झाला आहे.खरीप हंगामात भात , भुईमुंग , सोयाबीन , घेवडा , व अन्य कडधान्य पिकविली जातात. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जवळपास साठ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. तर भात तरवेही टाकता आले नाहीत.ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांचीही पेरणी वाया गेल्यामुळे त्यांचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे. तसेच मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने उन्हाळी पिके शेतातच काढणी अभावी कुजन गेली.अशा शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची तरतूद करून दिलासा द्यावा,व ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी ई मेल वरुन पाठविलेल्या निवेदनाद्वारे सुरेश पार्टे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने केली आहे.