जावली तालुक्यातील करंदोशी या गावात 30 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजल्याच्या सुमारास शंकर सिताराम कचरे या मेंढपाळाच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.तसेच काल रात्री उशिरा सीताबाई नामदेव महामुलकर या शेतकऱ्याच्या गोट्यात जाऊन बिबट्याने दोन शेळ्यांवर जीव घेणा हल्ला केला आहे.यामध्ये दोन शेळ्या या जागीच ठार झाल्या आहेत.यामुळे करंदोशी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून शेळ्या व गुरेचारण्यासाठी डोंगर माळरानावर नेली जात आहेत.परंतु दोन दिवसापासून करंदोशी व आजूबाजूच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिवसा व रात्री वाढल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यास घरा बाहेर पडणे अवघड झाले आहे.त्याचप्रमाणे या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्यांमुळे शेतकऱ्याचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेबाबत ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा पंचनामा केला आहे.तसेच वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्ग व ग्रामस्थांकडून होत आहे.