जावळी तालुक्यातील कुडाळ,मेढा, करहर,केळघर पंचक्रोशीतील चिकन विक्रेत्यांकडून शिल्लक चिकनचा कचरा मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी उघडयावर टाकला जात असून रस्त्याकडेला असणाऱ्या ओढ्या नदीच्या पुलाशेजारी बिनदास्त फेकून दिला जात आहे.असे चित्र कुडाळ-पाचवड रस्त्यावर पहायला मिळत आहे.अश्या पद्धतीने उघड्यावर चिकनचा वेस्टेज कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून होऊ लागली आहे.
तालुक्याचा परिसर मोठा असून विविध ग्रामपंचायतीमार्फत गावातील कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतीकडून सुविधा पुरवली जाते.चिकन विक्रीचा व्यवसाय करणारी मंडळी चिकनचा वेस्टेच कचरा उघड्यावर टाकत आहेत. ज्या परिसरात हा कचरा टाकला जातो त्या ठिकाणी चिकन वेस्टच कुजल्यानंतर दुर्गंधी पसरत आहे.यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.चिकन व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील चिकनच्या वेस्टेज कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
चिकनचा वेस्टेज कचरा हा ओढ्याच्या कडेला तसेच शेतीच्या बांधावर देखील मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.रस्त्यालगत असणाऱ्या ओढ्याच्या जवळ कचरा टाकला जात असल्याने वाहनधारकांना नाहक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.चिकन वेस्टच खाण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात कावळे तसेच भटकी कुत्रे एकत्र गोळा होत आहेत.त्या दरम्यान रस्त्यावरून ये-जा करत असणाऱ्या वाहनधारकांवर कुत्रे हल्ला चढवत आहेत.
ओढ्या लगत टाकलेल्या चिकनच्या कचऱ्यामुळे ओढ्याचे पाणी दूषित होऊ लागले आहे. या घाणीचा त्रास आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना भविष्यात सहन करावा लागनार आहे.तसेच सद्या यात्रा उत्सव सुरू झाले असण्याने मोठ्या प्रमाणत चिकन कटिंग केले जात आहे.परंतु राहिलेल्या चिकनच्या वेस्टजची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही.यावर प्रशासनाने त्वरित योग्य निर्णय घेऊन संबंधित चिकन दुकानांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून व वाहनधारकांकडून होऊ लागली आहे.
चौकट:
भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्यामुळे रेबिजने प्राण गेलेल्या घटना आपण वाचत आहोत.अश्या परिस्थितीत चिकनचा वेस्टज कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.रस्त्याच्या कडेला मोकळी जागा बघून रात्री अपरात्री हा कचरा अस्ताव्यस्त फेकून दिला जात आहे.ही बाब मानवी आरोग्याच्यादृष्टीने घातक ठरू लागली आहे.ज्या परिसरालगत हा कचरा टाकला जातो त्या परिसरात प्राण्यांचा वावर वाढत आहे.यामुळे या भटक्या कुत्र्यांकडून लहान मुले,माणसे तसेच वाहन धारकांवर हल्ले होण्याची दाट शक्यता वाढली आहे.परिसरात दुर्गंधी पसरत असून ही बाब मानवी आरोग्यास धोकादायक आहे.याकडे प्रशासन नेमके का डोळेझाक करीत आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.याबाबत चिकन व्यवसायिकांनी योग्य खबरदारी न घेतलेस त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र कायमचे रद्द करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.