हातकणंगले प्रतिनिधी
अक्षय कोठावळे..
श्री.अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, एनएसएस विभाग व आय एम कलाम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे ऐवजी रोटी डे हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. सद्या तरुणाई फेब्रुवारी महिन्यातील १४ तारीख म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरी करण्याकडे आकर्षित होत आहे. परंतु हातकणंगलेतील सुज्ञ युवकांनी एकत्रित येत २०१८ पासून .श्री.अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात १४ फेब्रुवारी रोजी रोटी डे हा उपक्रम राबवत आहेत. व्हॅलेंटाईन वीक हा प्रेमाचा आठवडा म्हणून रोज डे, प्रपोज डे, टेडी डे वा वॅलेंटाईन डे निमित्त होणारा पैशांचा अपव्य टाळत हे तरुण यानिमित्त समाजातील गोरगरीब, उपेक्षित घटकांसोबत रोटी डे म्हणून प्रेमाचा दिवस साजरा करावा या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबवतात.
यावर्षी ही आयोजकांनी मा.श्री.अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात रोटी डे निमित्त महाविद्यालय व परिसरातून अन्नधान्य, कडधान्य, फळे, सिलबंद खाद्यपदार्थ, कपडे साड्या इत्यादी वस्तूरुपी मदत संकलित करण्याविषयी आवाहन केले होते. १३ फेब्रुवारी पर्यंत या वस्तू महाविद्यालयात संकलित करण्यात आल्या यासाठी अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवली. यावर्षी १४ फेब्रुवारी रोजी रोटी डे निमित्त घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील आश्रित वृद्धांना महाविद्यालयात आमंत्रित करण्यात आले. सकाळी १० वा. त्यांचा महाविद्यालयात यथोचित सत्कार करत उत्साहाने स्वागत करण्यात आले. जानकी वृद्धाश्रमचे प्रमुख मा.बाबासो पुजारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
आय एम कलाम फाउंडेशनचे अध्यक्ष अनिस मुजावर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. रोटी डे संकल्पनेविषयी सविस्तर माहिती देत मागील सहा वर्षांचा आढावा मांडला.
महाविद्यालयाची शैक्षणिक उंची ही विद्यार्थ्यांवरील संस्कार व त्यांच्या वागणुकीतून प्रदर्शित होते, आपले विद्यार्थी रोटी डे सारखे अभिनव उपक्रम समाजापुढे नेऊन इतर तरुणांसमोर आदर्श निर्माण करत आहेत’, असे मत यावेळी प्राध्यापक डॉ.मोहन सावंत सर यांनी मांडले. जानकी वृद्धाश्रमचे संस्थापक बाबासाहेब पुजारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करत वृद्धाश्रमातील वास्तविक परिस्थिती, समाजामध्ये वाढत्या वृद्धाश्रमांची संख्या, नवयुवक-युवतींची आई-वडिलांविषयीची बदलती भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन केले. एकंदरीत निर्माण झालेल्या भावनिक वातावरणामुळे उपस्थितांपैकी अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत प्रेमळ संवाद साधत त्यांची मायेने विचारपूस केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.योजना जुगळे मॅडम यांनी रोटी डे या संकल्पनेबद्दल आयोजकांचे आभार मानले. महाविद्यालयाचे विद्यार्थी सामाजिक भान ठेवून गोरगरीब गरजूंसाठी, निराधार लोकांसाठी रोटी डे च्या माध्यमातून मदत कार्य पोचवत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केलं. प्रा.काजल मोरे मॅडम व प्रा.हेमांगी वडेर यांनी सूत्रसंचालन केले. दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तू, संकलित अन्यधान्य, कडधान्य, कपडे इ. जानकी वृद्धाश्रमला हस्तारित केले. महाविद्यालयाच्या वतीने उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम यानंतर पार पडला.