जावळी तालुका १६ वर्षापूर्वी दारूबंदीच्या एका वैशिष्ठ्यपूर्ण महिलांच्या लढ्याने चर्चेत आला. महिलांच्या विचारातील परिवर्तनाने क्रांती झाली आणि जावळी तालुक्यातील ६ गावातून १३ दारूची दुकाने महिलांच्या मतदानाने बाटली आडवी करून बंद झाली.जावळी तालुक्याचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहला गेला.पण त्याकाळीही हा लढा महिलांसाठी सोपा नव्हता.अनेक गावात प्रस्तापित पुढार्यांच्या बगलबच्चांची सरकार मान्य दारू दुकाने बंद होणार म्हणून त्यावेळीही अनेकांनी याला विरोध करून दुकाने वाचविण्याचा प्रयत्न केला होताच.आता अशीच काही मंडळी एकत्र येत असून जावळी तालुक्यातील अवैध दारू बंद होत नाही मग वैध दारू दुकानांना परवानगी द्या अशी मागणी करीत असून यांची भूमिका संशयास्पद असल्याचे टीका जावली तालुका व्यसनमुक्त संघटनेचे संघटक विलास बाबा जवळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
यापुढे आमचाच आवाज चालणार,आम्ही इथे एकही दारू व मटका अड्डा चालू देणार नाही अशी गर्जना काही वर्षापूर्वी अड्ड्यावर जावून तथाकथित नेत्याने केली पण एका कारवाईनेच ती हवेत का बरे विरली?असा प्रश्न विलास बाबा जवळ यांनी उपस्थित केला आहे.तथाकथित नेत्यांच्या आजुबाजुला फिरणार्या अवैध दारू विक्रेत्यांच्या जमिनी कोणी आणि कशा लाटल्या याचीही चर्चा जावळी तालुक्यात सुरू आहे.सत्तेच्या केंद्रस्थानी रहावूनही आपल्या गावातील अवैध व्यवसाय का बंद केले नाहीत यामागचे गौडबंगाल काय? असेही मत विलास (बाबा) जवळ यांनी व्यक्त केले आहे.
बाकी काही सह्यांजीरावांचे दारूबंदीसाठी महिलांना योगदान किती मिळाले. कुणाचे काय पराक्रम आहेत हे जनतेला ठावूक आहे.अवैध दारू विक्रेत्यांना धमकावून कोणत्या ढाब्यावर किती बाटल्या रिचविल्या याची नोंद ढाबेवाल्यांकडे नसली तरी काहींच्या या करामती कॅमेर्यात कैद झाल्याचेही विलास बाबा जवळ यांनी मत व्यक्त केले आहे.हागणदारी मुक्त गावे करण्यासाठी शौचालये बांधली तरीही लोकं रस्त्याच्या कडेला घाण करतात म्हणून शौचालये पाडायची का? अपघात होतात म्हणून अनेक ठिकाणी रस्त्याला गतिरोधक व मार्गदर्शक फलक बसविले तरी अपघात थांबत नाहीत म्हणून गतिरोधक व सुचना फलक काढून टाकायचे का?अवैध दारू धंद्याबाबत आवाज उठवून प्रत्येक वेळी वैध दारू दुकाने सुरू करा म्हणायचे म्हणजे नेमकी कुणाला तरी दारू दुकाने देण्याची यांनी सुपारी घेतली आहे का? असा प्रश्न जावली तालुका व्यसनमुक्त संघटनेचे संघटक विलास बाबा जवळ यांनी उपस्थित केला आहे.
तथाकथित समाजसेवकांना दारू व मटका वाल्यांनी फेकलेल्या तुकड्यावर जगण्याची गरज नाही. संशयास्पद भूमिका घेवून चळवळीला समाजात बदनाम करण्यापेक्षा आपल्याकडे सत्तास्थाने आहेत आणि आपण जिल्हा पोलिस प्रमुख यांनाही भेटायला जाणार आहात तर तथाकथित समाजसेवकांच्या मालमत्तेची व उत्पन्नाची व कर्जाचीही चौकशी करायला सांगा म्हणजे सत्य जनते समोर येईल.दारूबंदी करून पुरस्कार मिळविले असे आपल्याला वाटत असेल तर आता आपणही जनतेची काळजी घ्या.जावळी तालुक्यातील गाव तिथे परमिटरूम बार सुरु करा म्हणजे लोकांना मुबलक व स्वस्त दारूही मिळेल आणि या गावातून त्या गावात जाताना लोकांचे अपघातही होणार नाहीत.लाडक्या बहिणींचे संसारही उध्वस्थ होणार नाहीत.या कर्तुत्ववान भूमिकेमुळे आपणास व सह्याजीरावांनाही पुरस्कार मिळतील.चळवळी निर्माण करण्यासाठी खुप काही कार्यकर्त्यांना गमवावं लागत.जनतेचे नव्हे स्वतःचे डिझेल जाळावं लागत.अशी परखड भूमिका प्रसिद्ध पत्रकार व्दारे विलास बाबा जवळ यांनी मांडली आहे.ज्यांची घरे व्यसनाधितेच्या आगीत जळाली त्यांनाच त्याचे चटके जाणवणार. सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला येणारांना त्याची किंमत कधिच कळणार नाही. अशी टीका प्रसिद्धी पत्रकाद्वारे विलास बाबा जवळ यांनी केली आहे.