जावली तालुक्यातील शेतकरी व सभासदांच्या हक्काचा असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.गतगळीत हंगामात शेतकरी व सभासदांनी सहकार्य केल्याने गळीत हंगाम यशस्वी होऊ शकला. त्याचप्रमाणे आगामी गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी सुद्धा शेतकरी व सभासदांनी जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे प्रतिपादन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ (बाबा)शिंदे बाबा यांनी केले.
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली. सभेला माजी चेअरमन श्रीमती सुनेत्रा शिंदे,व्हाईस चेअरमन ऍड.शिवाजीराव मर्ढेकर,अंकुशराव शिवणकर,राजेंद्र फरांदे,बाळासाहेब निकम, प्रदीप शिंदे, प्रदीप तरडे, आनंदराव जुनघरे, आनंदा मोहिते पाटील,विठ्ठल मोरे,शोभाताई बारटक्के,ताराबाई पोफळे, बाळकृष्ण निकम,नानासो सावंत, रामदास पार्टे,गणपत पार्टे,शांताराम पवार,विजय शेवते उपस्थित होते.
सौरभ शिंदे म्हणाले,गेल्या पंचवीस वर्षात प्रतापगड सहकारी साखर कारखान्याने नैसर्गिक व आर्थिक संकटांचा सामना केला आहे. या कारखान्याला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी त्या-त्या वेळच्या संचालक मंडळांनी आटोकाट प्रयत्न केले.हा कारखाना सुरू राहिला तरच कारखान्याचे कामगार,ऊस उत्पादक सभासद यांचे व परिसरातील छोट्या मोठ्या उद्योजकांची प्रगती होणार आहे.आर्थिक अडचणीमध्ये गेले चार वर्षे हा कारखाना बंद राहिला होता. परंतु आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रकल्प पुन्हा उभारी घेत आहे.अजिंक्यतारा प्रतापगड उद्योग समूहाच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात सव्वातीन लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करून गळीत हंगाम यशस्वी केला आहे. आगामी गळीत हंगामात किमान चार लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे आपण सर्व मिळून साध्य करूया अशी साद चेअरमन सौरभ (बाबा)शिंदे यांनी सभासद व कामगारांना घातली आहे. गेल्या पंचवीस वर्षात कारखान्याच्या कामगारांना सुद्धा संकटांचा सामना करावा लागला आहे याची जाणीव संचालक मंडळाला आहे.परंतु कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू राहिल्यास कामगारांचे प्रश्न मार्गी लागतील.
प्रारंभी कारखान्याचे संकल्पक माजी आमदार लालसिंगराव शिंदे,संस्थापक राजेंद्र शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प. पू. नारायण महाराज तसेंच अहवाल सालात दिवंगत सभासद व मान्यवर तसेच शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बाळासाहेब निकम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्हा. चेअरमन ऍड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले.कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे यांनी सभेचे नोटीस व अहवाल वाचन केले.विकास यादव यांनी नफा तोटा पत्रक वाचून दाखवले.याप्रसंगी विक्रमी ऊस उत्पादन करणाऱ्या तसेंच कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कारखान्यातील विविध विभागात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांचे जिवलग मित्र व अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या आनंद शिवदे यांनी इंजिनिअरींग क्षेत्रात डॉक्टरेट पदवी मिळवल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
बापूराव गायकवाड यांनी महू हातगेघर धरणाचे व कालव्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी केली.प्रदीप तरडे यांनी आभार मानले.